शेळयांचे आजार, लक्षणे व त्यावरील उपाय

0

शेळी पालन करतांना शेळ्यांना होणाऱ्या आजारांबद्दल माहिती असणे फार महत्वाचे असते. विशेषतः आता पावसाळा झाला आहे, पावसाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते तर चला जाणुन घेऊया शेळयांचे आजार,लक्षणे व त्यावरील उपाय.

शेळ्यांना जिवाणूंमुळे पुढील प्रकारचे आजार होतात.

ब्रूसेलोसिस (Brucellosis): ब्रूसेलोसिस हा एक संसर्गजन्य आजार आहे. या रोगाचा प्रसार आजारी जनावरांचा चारा, वैरण, स्रावाद्वारे होतो. हा रोग जनावरांपासून मनुष्यालाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्षणे – शेळ्यांचा गर्भपात होणे किंवा मृत करडाला जन्म देणे. नरामध्ये वृषणाला सूज येणे.
उपाय – लहान वयात लसीकरण करणे. रोगाची लक्षणे झालेल्या शेळ्या विकून टाकणे.

फऱ्या: शेळ्या-मेंढ्यां तसेच गाईंमध्ये हा संसर्गजन्य रोग आढळून येतो गाईंमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून येतो.
लक्षणे – खांद्याला सूज येणे, शेळ्या लंगडणे, या आजाराची लागण झाल्यापासून तीन दिवसांत मृत्यु होतो.
उपाय – प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

घटसर्प (Diphtheria): या रोगाचे जंतू जमिनीत असतात, चारा व पाण्याद्वारे अन्ननलिकेत प्रवेश करतात. जनावराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर अनुकूल परिस्थितीमध्ये अंतःत्वचेमधून रक्तामध्ये प्रवेश करतात व या रोगाची लागण होते. शेळ्या, गायी, म्हशी, मेंढ्या व वराहमध्ये हा रोग आढळून येतो.
लक्षणे – नाकपुड्यांतून चिकट पातळ स्त्राव येणे , श्वासोच्छ्वास वाढने , घशावर वेदना देणारी सूज येणे. काही वेळा घसा, कपाळ व जिभेवर सूज येणे व मृत्यूही होतो.
उपाय – प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे. उत्तम रोगप्रतिकार शक्ती ६-९ दिवस लसीकरणापश्चात निर्माण होतो यामुळे जनावरांचे स्थलांतर करण्याच्या १० दिवस अगोदर रोगप्रतिबंधक लस टोचणे हिताचे ठरते.

फाशी: हा संसर्गजन्य आजार सर्व जनावरांना होऊ शकतो. या रोगाचे जंतू चारा, पाणी, स्राव व जखमांमधून शरीरात प्रवेश करतात त्यामुळे या रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे – कातडीमध्ये रक्त जमा होणे व शरीराच्या छिद्रामधून बाहेर पडणे, पाय लुळे पडणे, शरीरावर मानेवर सूज टी येणे व अचानक मृत्यू होणे.
उपाय – सदर रोगावर उपचार नाही. पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. मेलेल्या शेळ्या जमिनीत खोल पुराव्यात.

जोहन्स रोग(Paratuberculosis): हा संसर्गजन्य रोग शेळ्या, मेंढ्या, म्हशींपेक्षा गायीमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. या रोगाच्या जंतूंचा सुप्त काळ ६ ते १२ महिन्यांचा आहे. त्यामुळे लहान वयातील वासरांना करडांना, कोकरांना हा आजार होत नाही.
लक्षणे – पातळ रक्ती हगवण, फेसाळ विष्ठा व विष्ठेला दुर्गंधी येते. सांध्याला सूज येते, भूक मंदावते, अशक्तपणा, थकवा जाणवतो, प्रकृती रोडावते.
उपाय – प्रतिबंधक उपाय करावेत, स्वच्छता पाळावी.

फुफ्फुसाचा ज्वर /निमोनिया  (Pneumonia): हा आजार लहान वयातील वासरे, करडे कोकरांना प्राणघातक ठरू शकतो. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यावर विशेषतः – थंड दमट पावसाळी हवामान व अपूर्ण वायूविजन असलेल्या परिस्थितीत या रोगाची शक्यता अधिक असते. – हवाबंद गोठ्यातील मलमूत्राचे अमोनिया व इतर वायूंमध्ये रूपांतर होऊन अपुऱ्या वायूविजनामुळे गोठ्यात साठून राहतात व श्वसनासोबत श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात. – अमोनिया वायूच्या संपर्कामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो व सूज येते. साधारणतः ९० टक्के करडे निमोनिया व पचनसंस्थेच्या विकारामुळे मरण पावतात.
लक्षणे – श्वासननलिकेत कफ साठतो, नाकपुड्यांतून बाहेर येतो, नाकपुड्या बंद होण्याची वेळ येते किंवा श्वसनाला त्रास होतो, थंडी वाजते, प्रतिकारशक्ती कमी होते.
उपाय – लहान वयातील करडांच्या गोठ्याची विशेष काळजी घ्यावी. गोठा स्वच्छ, हवेशीर, ऊबदार ठेवावा गरज पडल्यास शेकोटी पेटवावी किंवा जमिनीवर चाऱ्याचे आच्छादन करावे.

वरील माहिती परिपूर्ण असावी याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत, ही माहिती आपल्याला उपयोगाची वाटल्यास नक्की शेयर करा